मुंबई :  आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष विधिमंडळाकडे लागलंय. विधानसभेत कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट - एटीआर) सादर करण्यात आलाय. आजच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून १६ टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झालंय. थोड्याच वेळात म्हणजे १.३० वाजता मराठा आरक्षणाचं विधेयक मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची आझाद मैदानात बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार आहे.


आरक्षण विधेयकाचं नाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधीत बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक' असं लांबलचक नाव या विधेयकाला देण्यात आलंय. 


राज्यात एकूण मराठा जनसंख्या ३१ टक्के नोंदवण्यात आलीय. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्गांतर्गत (Socialy & Economically Backword Class) मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. 


मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी...


- मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण


- अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण


- राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के


- मात्र, केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाला तूर्तास आरक्षण देण्यात येणार नाही


महाराष्ट्रात सध्याची आरक्षणाची स्थिती


अनुसूचित जमाती (ST) - ७ टक्के


अनुसूचित जाती (SC) - १३ टक्के


ओबीसी - १९ टक्के


भटक्या जमाती (NT) - ११ टक्के


विशेष मागास वर्ग (SBC) - २ टक्के


विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचा जल्लोष


मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत मांडला गेला. त्यानंतर भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकच जल्लोष केला. भगवे फेटे परिधान करत आणि  एकमेकांना मिठाई देऊन हा क्षण साजरा करण्यात आला.


अखेर बरेच दिवस मराठा समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला. आज सकाळी १०.३० वाजता मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.  त्यानंतर विधेयक आजच सभागृहात मांडलं जाणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली होती. मराठा आरक्षण विधेयक सादर केल्यानंतर भाजपानं जल्लोषाची तयारी देखील सुरू केलीय. दुपारी दोन वाजता जल्लोषासाठी तयार राहण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.  


उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस


तत्पूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती समिती अहवाल विधिमंडळात मांडला जाणार आहे. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असल्याने सरकारला आजच मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मांडून ते मंजूर करून घ्यावं लागणार आहे.


ओबीसी समाजाचं आक्रोश आंदोलन


सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊ केलं आहे. पण ५२ टक्के ओबीसींना आजही पुरेसं आरक्षण दिलं गेलेलं नाही. त्यामुळे सरकारला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून आज आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत. २७ टक्के आरक्षण १९ टक्क्यांवर आणलं आहे. जातीनिहाय जनगणना न करता मराठा समाजाला एकतर्फी १६ टक्के आरक्षण ही ओबीसींची फसवणूक असल्याची भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय. जातीनिहाय जनगणना करून त्यानंतर आरक्षण द्यावे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय.