मुंबई : शिवसेना (Shiv Sena) प्रवेशानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी आज शिवसेना भवनाला भेट दिली. त्यांनी कामाच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, आपण काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या, असे 'कॅफे २४ तास'मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना गौप्यस्फोट केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांनी बुधवारी शिवसेना भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक दिवस असल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्या पाया पडून नवीन कामाला सुरुवात करायला आवडले असते, असेही त्या यावेळी म्हणाल्या.


तसेच यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर 'झी २४ तास'वरील 'कॅफे २४ तास' कार्यक्रमातही सहभागी झाल्या. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी आपणाला अनेक राजकीय पक्षांनी पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या महिला आघाडीत यापुढे काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही पदासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. तसंच शिवसेना प्रवेशासाठी आपणावर कोणताही दबाव नव्हता, असा पुनरुच्चारही मातोंडकर यांनी केला. आमदार नियुक्तीबाबत राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.



फिल्मसिटीवरुन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जोरदार राजकारण रंगलं.  योगी आदित्यनाथ विरुद्ध शिवसेना अशी अक्षरशः ढिशूम ढिशूमच रंगली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये फिल्मसिटी वसवण्याची घोषणा केली. त्याआधी योगी आदित्यनाथांनी मुंबईत उद्योजकांची आणि अभिनेत्यांची भेट घेतली. फिल्मसिटीबाबत खुली स्पर्धा असायला हवी. ती काही पर्स नव्हे, उचलून घेऊन जायला, असेही योगी यांनी म्हटले. 


योगी यांनी ही घोषणा करताच मुंबईशी स्पर्धा करायला धाडस लागते, असे संजय राऊत यांनी सुनावले. एवढंच नव्हे तर पाली हिलला राहणारे कलाकार यूपीत राहायला जाणार आहेत का, असा सवालही केला. उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे, हे पाहायचं असेल तर मिर्झापूर वेब सिरीज पाहा, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तर बॉलिवूड आणि मुंबईचे नाते घट्ट आहे, याकडे शिवसेनेत आलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी लक्ष वेधले. उल्लेखनीय बाब म्हणजे ओढून ताणून कुणालाही उद्योग परराज्यात घेऊन जाता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच लगावला होता.