मुंबई :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरून भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता आहे.  राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या युपीतल्या खासदाराने विरोध दर्शवला आहे. यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश देऊ नये अशी मागणी भाजपचे खासदार बृजभूषण शरह सिंह यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं त्यांनी म्हटलं आहे. 


जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असंही खासदार म्हणाले. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी सलग ट्विट केले. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी'


ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सल्ला दिला आहे. 'राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे. राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.


उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचं कौतुक केलं असतानाच भाजप खासदाराने राज ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकर वादानंतर मनसेची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. 


मात्र, मनसे आणि राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका सर्वश्रुत आहे. यूपी आणि बिहारचे लोक महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या नोकऱ्या हिसकावून गुन्हेगारी घटना घडवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. मनसेच्या या भूमिकेमुळे भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.