दुर्लक्षित घटकांचं लसीकरण, मुंबईत चार फिरते लसीकरण केंद्र
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई : कोविड – 19 प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाज घटकांचं लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagar Palika) आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स् (Vaccine on Wheels), अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
कोविड – 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत-जास्त नागरिकांचं जलद गतीने लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचं त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (Mobile Vaccination Unit) सुरु करण्यात आले आहेत.
यासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स् (Vaccine on Wheels) आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन (American India Foundation) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह भागीदारी केली आहे. इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱया तसंच कोविड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम या भागीदारीतून हाती घेण्यात आला आहे.
यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देह विक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधीत बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सुरुवातीला एकूण 4 फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये 1 प्रशिक्षित डॉक्टर, 2 परिचारिका, 2 वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे, जेणेकरुन कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.
आज पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील 50 विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या 25 महिलांचं लसीकरण करण्यात आलं. या लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी संबंधीत व्यक्तिंना प्रशिक्षण देखील दिलं जात आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये, संबंधीत समाज घटकांच्या परिसरात महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. 12 ऑगस्टपासून यारितीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱया महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील.