मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. सबनीस यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर आज म्हणजेच शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं होतं. ज्यानंतर १९६८ पासून त्यांनी अव्याहतपणे व्यंगचित्रकलेची साधना केली. सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकीर्दीला यंदाच  म्हणजे २०१९मध्येच ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त २० फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात आयोजित 'रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची' या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरवही करण्यात आला होता.  



राजकीय व्यंग अचूकपणे हेरुन कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे व्यंगचित्रकार अशी त्यांची ख्याती होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमागचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती पाहून आकर्षित झाल्याने त्यांनी राजकीय व्यंगचित्रकार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच आर.के. लक्ष्मण हेसुद्धा त्यांच्या आदर्शस्थानी होते.