Video: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, `मला 100 टक्के खात्री...`
Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे भाषण देत होते. त्याचवेळेस त्यांना समोरच्या गर्दीत एक चेहरा दिसला आणि त्यांनी थेट त्या व्यक्तीशी मंचावरुन संवाद साधू लागले.
Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी मुंबईमध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान एक रंजक किस्सा घडला. राज ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या गर्दीमध्ये एका व्यक्तीला पाहून आपलं भाषण थांबवलं आणि त्या व्यक्तीला थेट मंचावर बोलवलं. ही व्यक्ती होती रिल्सच्या माध्यमातून मराठी घराघरात प्रसिद्ध झालेला इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर अथर्व सुदामे.
राज यांनी अथर्व सुदामेला पाहिलं अन्...
मनसे विद्यार्थी सेनेनं रिलबाज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी मराठीमधील प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर्सला आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये रोज इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या माध्यमातून भेटणाऱ्या अनेकांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे भाषण देण्यासाठी उभे राहिले. आपलं भाषण सुरु असतानाच राज ठाकरेंना समोर अथर्व सुदामे दिसला आणि त्यांनी थेट माईकवरुनच त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. "अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत. हा हा उभा राहा!" असं राज ठाकरेंनी म्हणताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर अथर्व जागेवर हसत उभा राहिला आणि त्याने वाकून आपल्या जागेवरुन राज ठाकरेंनी केलेल्या कौतुकाला नमस्कार करत प्रतिसाद दिला.
थेट मंचावर बोलवलं
"तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का. अनेकांच्या बघतो," असं राज ठाकरे अथर्वला हसत म्हणाले. त्यानंतर प्रेक्षकांमधून काहीजण राज ठाकरेंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. नंतर राज ठाकरेंनी अथर्व आणि विनायक माळीला मंचावर बोलवलं. इतरांना न बोलवल्याबद्दल राज यांनी माफीही मागितली. विनायक माळी आणि अथर्व सुदामे स्टेजवर आल्यानंतर राज ठाकरेंनी, "बाकीच्यांनी वाईट वाटून घेऊ नका. अनेक लोक असतील इथे. मला माफ करा. भेदभाव नाही. मला आता दिसला म्हणून मी बोलवलं," असं म्हटलं.
महाराष्ट्राचं राजकारणाचा उल्लेख
विनायक माळी आणि अथर्व सुदामे स्टेजवर राज यांच्या बाजूला उभे असताना त्यांनी, "मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल तुमच्या रिल्सच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. आता महाराष्ट्राचं राजकारण ज्या खालच्या थराला गेलंय त्या खालच्या थराला जाण्याची तुम्हाला गरज नाही," असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.
मला 100 टक्के खात्री...
"मी व्यंगचित्रकार असल्याने एखाद्या गोष्टीतून चिमटे कसे काढायचे आणि प्रबोधन कसं करायचं मला उत्तम रितीने माहिती आहे. त्या गोष्टी तुम्ही उत्तमरीतीने करु शकाल याची मला 100 टक्के खात्री आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांकडे तुम्ही लक्ष द्यावं. महाराष्ट्रातील प्रश्न तुमच्या विनोदाच्या रुपाने, उहासात्मक पद्धतीने लोकांसमोर यावेत अशी मला अपेक्षा आहे. यामधून लोकांमध्ये जागृकता निर्माण होईल," असंही राज म्हणाले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी सनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसेचे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदिप देशपांडेही उपस्थित होते.