दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा केली.काँग्रेसने विधानपरिषदेसाठी २ उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार करण्यासाठीची ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असंच चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपने आधीच ४ जणांचे उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर महाविकासआघाडीत शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढणार हे जवळपास निश्चित आहे. या निवडणुकीत काँग्रेस १ जागेवर लढेल, असं बोललं जात होतं. पण काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे.


महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी २-२ जागांवर लढणार असल्यामुळे त्यांच्या ६ जागा आणि भाजपने तिकीट दिलेले ४ उमेदवार, असे १० उमेदवार रिंगणात येतील. ९ जागांच्या निवडणुकीत १० उमेदवार उभे राहिले, तर निवडणूक अटळ आहे. 


काय आहे विधानपरिषदेचं गणित?


या निवडणुकीत विधानसभेतील २८८ आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर एक उमेदवार निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा आहे.


महाविकासआघाडीला कोणाचा पाठिंबा?


महाविकासआघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ असे एकूणण १५४चं संख्याबळ आहे. याशिवाय प्रहारचे २, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा १, शेकापचा १, बहुजन विकासआघाडीचे ३, सपाचे २, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा १ आणि अपक्ष ७ असे एकूण १५४+१७ म्हणजेच १७१ आमदारांचं पाठबळ आहे. 


महाविकासआघाडी ६ जागा लढवत असल्यामुळे २९ मतांच्या कोट्यानुसार त्यांचे सगळे ६ उमेदवार जिंकण्यासाठी १७४ मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा जिंकण्यासाठी महाविकासआघाडीला ३ मतं कमी पडत आहेत. ही ३ मतं लहान पक्ष जे तटस्थ आहेत, त्यांची मत मिळून सहावी जागा जिंकता येईल, असा काँग्रेसचा दावा आहे.


भाजपचं संख्याबळ किती?


भाजपने आधीच ४ जणांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण ११३ आमदार आहेत. २९ मतांच्या कोट्यानुसार भाजपला ४ जागा निवडून आणण्यासाठी ११६ मतांची गरज आहे. महाविकासआघाडीप्रमाणेच भाजपलाही चौथी जागा जिंकण्यासाठी ३ मतच कमी पडत आहेत.


विधानसभेमध्ये तीन पक्ष तटस्थ असून त्यांच्याकडे एकूण ४ आमदार आहेत. यामध्ये एमआयएमचे २, मनसेचा १ आणि सीपीएमचा १ आमदार आहे. विधानपरिषदेवर अधिकचा आमदार महाविकासआघाडीचा जाणार का भाजपचा हे या तटस्थ आमदारांवर अवलंबून आहे. 


 विधानपरिषदेसाठी उमेदवारांना ११ मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १४ मेपर्यंत कोणीच अर्ज मागे घेतले नाहीत, तर २१ मे रोजी विधानपरिषदेची निवडणूक होईल.


विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी?


विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यासाठी विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे विधानपरिषद निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद आणि महाविकासआघाडी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.


विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपालनियुक्त आमदार बनवण्यासाठी महाविकासाआघाडीने भगतसिंग कोश्यारी यांना दोनवेळा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावर राज्यपालांनी स्वाक्षरी न करता निवडणूक आयोगाला विधानपरिषद निवडणूक घेण्याची विनंती केली. यानंतर निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली.