मुंबई : मुंबईकरांसाठी पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगली बातमी दिली. सध्या मुंबईत पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा दुसरा तलाव पूर्णपणे भरुन वाहत आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.  महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव रात्री पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्यावर्षी ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधी २०१८ मध्‍ये  १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.



मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान दोन तलावांपैकी एक आहे. दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली.



दुसरीकडे, मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गरज असेल तर घराबाहेर पडा अन्यथा पडू नका, असे आवाहन मुंबई महापालिकेने तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळं निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेआहे. मुंबई महापालिका क्षेत्रात काल यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात २१५. ८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०९.९ मिलीमटर तर, पश्चिम उपनगरांमध्ये ७६. ०३ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.