मुंबई : रेमंड समूहाचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच सिंघानिया यांची बायपास सर्जरी झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी संध्याकाळी साऊथ मुंबई क्लब येथे डॉ. विजयपत सिंघानिया यांना छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हेमंत ठाकर यांनी तपासणी करून त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. 'पुढील ४८ तास त्यांना देखरेखीखाली ठेवले जाईल. सिंघानिया यांना उच्च रक्तदाब असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे’ असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.


देशातील  श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या सिंघानिया कुटुंब संपत्तीच्या वादामुळे चर्चेत आले आहे. रेमंड या प्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक असलेले  विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुलाकडे कंपनीची जबाबदारी सोपवली होती. सध्या विजयपत सिंघानिया मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीत राहतात.


त्यांना मुलाने बेघर केल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. विजयपत सिंघानियांनी मलबार हिलमधील घराचा ताबा मिळवण्यासाठी  मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ‘मुलगा विजयपत सिंघानिया यांची काळजी घेत नाही, विजयपत यांची कार आणि चालकदेखील काढून घेतले’ अशी व्यथा विजयपत सिंघानिया यांनी वकिलांच्यावतीने मुंबई हायकोर्टात मांडली होती.