प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : विरारमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विरार पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार पूर्वेच्या गोपचार पाडा परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोपचार पाडा परिसरातल्या आशियाना अपार्टमेंटमध्ये मोबीन शेख हे आपल्या पत्नी व मुलांसोबत राहतात. मोबीन शेख हे माहिती अधिकारात सक्रिय आहेत. अशातच रविवारी घरी झोपले होते. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोबीन शेख हे पत्नी, दोन मुली व मुलासोबत खिडकीला लागून असलेल्या बेडवर एकत्र झोपले होते.


त्यावेळी आरोपींनी मोबीन शेख यांच्या घराचा दरवाजा ठोकून आमची आई आजारी आहे असे सांगितले आणि मदत मागण्याचा बहाना केला. याच दरम्यान आरोपींनी खिडकीतून मोबीन शेख यांच्या बेडवर एक गोळी झाडून पळ काढला. सुदैवाने झाडलेली झालेली गोळी कोणाला न लागता भिंतीला घासून गेली. त्यामुळे या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.


घटनेची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपिंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2023 मध्ये मोबीन यांच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.