मुंबई, रायगडला मान्सूनची प्रतीक्षा, उकाड्याने घामाच्या धारा
मान्सून दक्षिण कोकणात गुरूवारी दाखल झाला असला तरी मुंबईला अजूनही मान्सूनची प्रतीक्षाच आहे.
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात गुरूवारी दाखल झाला असला तरी मुंबईला अजूनही मान्सूनची प्रतीक्षाच आहे. मुंबईत मान्सून कधी येणार असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झालेत. तिकडे रायगडमध्येही मान्सूनचा पत्ताच नाही. त्यामुळे सारेच चिंतेत आहेत. तर रत्नागिरीत चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानंतर पाऊसच झालेला नाही. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.
जूनच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व सरी बरसल्या अगदी १५ जूनपर्यंत अधूनमधून रत्नागिरी आणि रायगड जिल्हयाच्या सर्वच भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यावर पेरणी झालेल्या शेतात रोपे इंचभर उगवून वर आलीत. मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कडकडीत ऊन पडले आहे. त्यामुळे रोपे सुकण्याची भीती व्यक्त होत आहे.
मान्सून २२ जूनला रायगडात येईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. परंतु अद्यापतरी तशी चिन्हे दिसेनात. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतीची कामे सुरू झाली असली तरी पावसाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटायला सुरूवात झाल्याने पाणीच्यादेखील समस्या निर्माण होवू शकते, अशी परिस्थिती आहे. आजही अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.