राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंना `वालेकुम सलाम`; नक्की काय घडलं वाचा
माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला होता आणि फोनवरून ते `अस्सलाम वालेकुम` असं म्हणाले.
मुंबई : माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला होता आणि फोनवरून ते 'अस्सलाम वालेकुम' असं म्हणाले. त्यावेळी आपण त्यांच्यावर भडकलो आणि त्यांना 'जय श्रीराम' असं उत्तर दिलं असही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला तेव्हा राजनाथ सिंग यांनी हे उदगार काढल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.
पुन्हा 'एकला चलो रे' चा नारा
शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागले. त्यानंतर आता 15 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.
आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार हे उपस्थित होते. माजी आमदारांना तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे. आता आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीत दिले.