`दोस्ती कन्स्ट्रक्शन`च्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना... गुन्हा दाखल
रहिवाशांनी दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या या बांधकामाबाबत आक्षेप घेवून बीएमसीकडे तक्रार केली होती
मुंबई : मुंबईतील वडाळा भागातील अॅन्टॉप हिल परिसरात 'लॉईड इस्टेट' इमारतीची संरक्षक भिंत कोसळली तसंच शेजारचा रस्ताही खचला. विद्यालंकार रोडवरच्या 'लॉईड इस्टेट' परिसरात ही 'दोस्ती पार्क' इमारत बांधण्यात काम सुरु असून त्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला. त्यामुळंच ही संरक्षक भिंत कोसळल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या दुर्घटनेत पार्किंग केलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही रस्त्याच्या दर्जाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केला जातोय.
लॉईड इस्टेटमधील रहिवाशांनी दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या या बांधकामाबाबत आक्षेप घेवून बीएमसीकडे तक्रार केली होती. इमारतीला धोका असल्याचे सांगूनही बीएमसीनं काहीच कारवाई केली नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या ढीगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतंय.
मात्र, अग्निशमन दल आणि डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचं याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक सुफियान वनू यांनी केलाय.
गुन्हा दाखल
पहाटे ४.३० वाजल्याच्या सुमारास लॉइड इस्टेट, विद्यालांकर रोड, वडाळा पूर्व मुंबई या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या ठिकाणी यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने मानवी जीवन धोक्यात येईल असे जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान २८७, ३३६, ४३१, ४२७ नुसार गुन्हा दाखल केलाय. यात सदर निष्काळजी बांधकामामुळे सार्वजनिक रस्त्यावर सुरक्षितता कमी होऊन 'लॉइड इस्टेट' इमारतीमधील रहिवासियांची वाहने मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन नुकसान झाले, म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.