मुंबई महापालिका आयुक्त विरूद्ध नगरसेवक संघर्ष
मुंबई महापालिकेत शुक्रवारी महापालिका आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा संघर्ष पाहायला मिळाला.
मुंबई : मुंबई महापालिकेत शुक्रवारी महापालिका आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा संघर्ष पाहायला मिळाला. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सभागृहाचा अवमान केला असल्यानं त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला.
काय आहे कारण?
सर्वपक्षीय नगरसेवकांना अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिका मोबाईल अँपचं लाँचिंग करण्यात आलं. त्यामुळं सत्ताधारी शिवसेनेसह इतर पक्षांचे नगरसेवकही संतप्त झाले. आयुक्त माफी मागत नसल्यानं नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काय केले आयुक्तांनी?
६ डिसेंबर हा दुःखद दिवस असताना त्यादिवशी महापालिका अॅप लाँचिंग कसं करता, असा सवाल सभागृह नेते यशवंत जाधवांनी केला. तर आपण कुणाचाही अवमान केलेला नाही, असं आयुक्तांनी सांगितलं. अखेर महापौरांच्या आवाहनानंतर शिवसेना नरमली आणि या वादावर पडदा पडला.