मुंबई: शहरामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात कुठेही पाणी तुंबले नाही, असा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी या पावसामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे दाणादाण उडाली. मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले. अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने केलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही. तसेच रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. सिग्नलवर गाड्या थांबल्या असतील तर ती वाहतूक कोंडी म्हणायची का, असा प्रतिसवालही महाडेश्वर यांनी केला. एवढेच नव्हे तर सर्व मुंबईकर आनंदी असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महापौरांच्या या वक्तव्यानंतर सामान्य मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्यानंतर पालिका आणि महापौरांना परिस्थितीचे गांभीर्य नाही, अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केल्या आहेत. 


पावसाळ्यापूर्वीचे नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून केला जात होता. तसेच पाणी उपसण्यासाठी पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आल्याचे पालिकेकडून सांगितले जात होते. मात्र, काल रात्रीपासून पडत असल्यामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल हे परिसर नेहमीप्रमाणे जलमय झाले होते. सायनच्या गांधी मार्केटमध्येही हीच परिस्थिती होती. कुर्ला, सांताक्रुझ परिसरातही पाणी तुंबल्याने कुर्ला डेपो ते बीकेसी पर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याशिवाय, लबाग, दादर, हिंदमाता, कुर्ला, सायन, माटुंगा, चेंबूर, गोवंडी, किंग्ज सर्कल, धारावी, भांडूप, कांजूरमार्ग, वरळी, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातही पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.