मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय 1 ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी निष्कासित करण्यात येणार आहे. तसंच वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक 32 दरम्यान नव्याने टाकलेल्या 750 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामं 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजल्यादरम्यान केली जाणार आहेत. या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत जीर्ण जलवाहिनी निष्कासित करणे, नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करणे आदी कामे केली जाणार आहेत.  या कामानंतर पाली हिल जलाशयाची पातळी सुधारणार आहे. एकंदरीतच एच पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे. 



दुरूस्ती कामामुळे खालील परिसरांना शुक्रवारी 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल



पेरी परिक्षेत्र- 


वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2) येथे पाणीपुरवठा बंद राहील.


खार दांडा परिक्षेत्र- 


खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुइम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी 5.30 ते रात्री 8.30) येथे पाणीपुरवठा बंद राहील.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिक्षेत्र-


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग लगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार, खार पश्चिमेच्या काही भागात (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - रात्री 9 ते 12) पाणीपुरवठा बंद राहील.



संबधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. जलवाहिनी दुरुस्ती झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. तसंच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलं आहे.