हिंसा नको, चर्चेला या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सकल मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी मुंबई आणि ठाण्यात बंद पाळण्यात आला.
मुंबई: सरकार मराठा समाजाशी चर्चा करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. सकल मराठा समाजाने हिंसा किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार सदैव तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
सकल मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी मुंबई आणि ठाण्यात बंद पाळण्यात आला. मात्र, दुपारी मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयक समितीकडून अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन बंद आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर काहीवेळातच मुख्यमंत्र्यांनी सरकार सकल मराठा समाजाशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. हिंसेपेक्षा चर्चेचा मार्ग केव्हाही चांगला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न या सर्व बाबी अतिशय दु:खद आहेत, असे नमूद करताना काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बुधवारी दुपारी मुंबई बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. समन्वयक समितीचे सदस्य रवींद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा संघटनांची भूमिका सविस्तरपणे मांडली. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठा समाज मुंबई बंद करु शकतो, हे आज सिद्ध झाले आहे. या बंददरम्यान मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत, असे रवींद्र पवार यांनी सांगितले.