दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांशी ज्याप्रकारे वागतात तशा धडाकेबाज पद्धतीने वागायला आम्हाला जमत नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. ते मंगळवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. अशोक चव्हाण यांनी म्हटले की, महाराष्ट्रात जो चमत्कार घडला आहे, तो नियतीला मान्य आहे. भाजपला अजूनही आपले सरकार पुन्हा येईल, असे वाटते. मात्र, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत तोपर्यंत तुम्ही परत येणार नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अशोक चव्हाण यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही टिप्पणी केली. आम्ही तुमच्याशी प्रेमाने आणि नरमाईने वागतो, एवढेच मला सांगायचे आहे. मात्र, अजिदादांचा कारभार धडाकेबाज असतो. ते थेट बघून घेईन, असे म्हणतात. आम्हाला तसे जमणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल. मात्र, त्यासाठी दादा तुम्ही तिजोरीच्या चाव्या ढिल्या करा. जेणेकरून नवी मुंबईचा विकास करता येईल, असेही चव्हाण यांनी म्हटले. 


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. कालच यासंदर्भात  महाविकासआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन गणेश नाईक यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.