मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील चर्चेचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. किमान समान कार्यक्रमावर सहमती झाल्याशिवाय आम्ही पुढची दिशा ठरवणार नाही, असे आघाडीकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. अहमद पटेल, वेणुगोपाल राव आणि मल्लिकार्जून खरगे या काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांनी आम्हाला खूप सवड दिलीय, शरद पवारांचा खोचक टोला


या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय घेण्यापूर्वी सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. आजच्या चर्चेनंतरही अनेक पैलूंवर व्यापक चर्चा होण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे यावर सहमती झाल्यानंतरच पुढील दिशा ठरवता येईल, असे महाआघाडीकडून स्पष्ट करण्यात आले. 



यावेळी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. भाजपने आतापर्यंत गोवा आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये मनमानी करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले. ही लोकशाही व संविधानाची थट्टा आहे. राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. यानंतर काँग्रेसला निमंत्रण मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही, हे अयोग्य असल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.