वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!
Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
Mumbai News Today: मे महिन्याची सुरुवात होऊन आठवडाही पूर्ण झाला नाहीये. तरीहीदेखील उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. उष्मामुळं आणि घामाच्या धाराने हैराण झालेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळं तब्येतीच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. मुंबईकर या काही दिवसांपासून पोटाच्या इन्फेक्शनमुळं हैराण झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात दररोज 31 लोक गॅस्ट्रोसारख्या संसर्गाने रुग्णालयात दाखल होत आहे. शहरातील सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयातही पोटाच्या संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
जेजे रुग्णालयातील आरोग्य विभागाचे युनिट हेड मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये जवळपास 300 रुग्ण गॅस्ट्रोसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. अतिसार, अलटी, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांनी हैराण झालेले रुग्णांना दाखल करण्यात आले होते. 4 ते 5 दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरा होतो. तर, ओपीडी बेसिसवर 2 दिवसांत रुग्ण बरा होतो.
पोटदुखीचे मुख्य कारण जंकफुड
मुंबईत स्ट्रीट फुड किंवा जंक फुड मोठ्या आवडीने लोक खातात. रस्त्यालगत असलेले किंवा बाजारातील हातगाड्यांवर मिळणारे, वडापाव, समोसे, चायजीज भेळ, पाणी पुरी, फ्रुट प्लेट हे मोठ्या आवडीने लोक खातात. मात्र, या हे खाद्य पदार्थ व पेय कशा पद्धतीने बनवले गेले आहे, याचा विचार मात्र लोक करत नाहीत. कोणत्या तेलात हे पदार्थ तळले आहेत. याचा विचार मात्र लोक करत नाहीत. तसंच, हे खाद्य पदार्थ झाकून ठेवण्यात आले आहेत का, याकडे ही लक्ष देत नाहीत. रस्त्यालगत किंवा स्टॉल्सवर खाद्यपदार्थ व पेयपदार्थ उघड्यावरच विकले जातात. त्यामुळं गाड्यामुळं होणारं प्रदूषण, रस्त्यावरची धुळ, घाण येथे घोंगावणाऱ्या माशा या पदार्थांवर जाऊन बसतात. दुषित अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटात संसर्ग होतो त्यामुळं इन्फेक्शन होण्याचीही भीती असते.
दुषीत अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं गॅस्ट्रोचा संसर्ग होतो. इन्फेक्शन झाल्यामुळं आतड्यांना सूज येते. त्यामुळं शक्यतो बाहेरचे खाणे टाळा, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये 916 लोकांना गॅस्ट्रोचा संसर्ग झाला आहे. तर, मार्चमध्ये हा आकडा 637 इतका आहे. मुंबईत गॅस्ट्रोच्या संसर्गात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे दुषित पाणी किंवा अस्वच्छ आहार आहे. यामुळं अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये गॅस्ट्रोच्या संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे. जानेवारीत 536 प्रकरणे समोर आली आहेत. तर, एप्रिलमध्ये 916 लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.
लक्षणे
मळमळणे, उलटी होणे
अतिसार, पोटात तीव्र वेदना
पहिले दोन दिवस ताप
काय करावे
स्वच्छता बाळगा
जेवण व्यवस्थित शिजवून खा, बाहेरचे खाणे टाळा
कोमट पाणी प्या
जेवण चांगलं झाकून घ्या
काय करु नका
सेल्फ मेडिकेशन करु नका
फास्ट फूड आणि जंक फुड खाऊ नका
कापून ठेवलेले फळ आणि बर्फ घातलेले ज्यूस पिऊ नका
शिळे जेवण जेवू नका