Mumbai Weather : हुडहुडी! मुंबईतील तापमानात लक्षणीय घट, सध्याचा आकडा पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही
Mumbai Weather Update : मुंबई सोडून कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात, तर सर्वात आधी ही बातमी वाचा. कारण, मुंबईतील ही थंडी तुम्हाला थेट थंड हवेच्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव देईल.
Mumbai Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये रक्त गोठवणारी थंडी पडलेली असतानाच आता त्याचे परिणाम थेट मुंबईपर्यंत (Mumbai Climate Change) दिसू लागले आहेत. संपूर्ण देशातच तापमान काही अंशांनी खाली आलेलं असताना आता मुंबईसुद्धा (Mumbai Cold Wave) येत्या काही दिवसांमध्ये गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्याच्या वेळी रात्री आणि पहाटे मुंबईत तापमान 16 अंशांवर (Mumbai Temperature) असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं मुंबई आणि माथेरानमध्ये फारसा फरक नसल्याचीच बाब इथं सर्वांचं लक्ष वेधत आहे. मुंबईतील तापमानात झालेली घट पाहता अनेकांचाच यावर विश्वास बसत नाहीये.
चार दिवस थंडीचे...
सध्या मुंबईत कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत असून, गुरुवारी तापमानात मोठ्या फरकानं घट झाली. मुख्य म्हणजे यापुढील चार दिवस म्हणजेच या आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवातही थंडीनं होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळं नागरिकांना सतर्क राहत आरोग्याची काळजी घेण्यांही आवाहन प्रशासन करत आहे.
हवामान अभ्यासक आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यामध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असेल. काही भागांमध्ये रात्रीचं तापमान 4 अंश तर दिवसा हेच तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असेल. फक्त थंडीच नव्हे तर, या काळात दाट धुक्यामुळंही जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. राज्यांतर्गत वाहतुकीवर याचे थेट परिणाम होतील. विमान आणि रेल्वे सेवा यामुळं काही प्रमाणात प्रभावित असतील.
काश्मीरमध्ये बर्फवृष्टी आणखी गोठवणार...
काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या दिवसांत थंडी वाढणार असून, बहुतांश भागांमध्ये अपेक्षेहून जास्त बर्फवृष्टी होणार आहे. सध्या विस्कळीत असलेल्या मानवी आयुष्यावर याचे आणखीही परिणाम दिसणार आहेत. काश्मीरमध्ये सध्या अनेक ठिकाणी तापमान शुन्यापेक्षाही कमी आहे. पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी आणि मैदानी भागांमध्ये पाऊस अशी एकंदर परिस्थिती असल्यामुळं इथं थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. फक्त काश्मीरच नव्हे, तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या भागांमध्येसुद्धा येत्या काही दिवसांत बर्फवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : देशातील शेकडो वर्षांपूर्वीच्या 'या' मंदिराच्या पायऱ्यांमधून येतात गूढ आवाज, तुम्ही ऐकलाय का?
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसांमध्ये देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्येसुद्धा तापमानात घट होणार आहे. सोप्या शब्दांत भारतामध्ये थंडीची आणखी एक लाट आली असून, उत्तर भारत यामुळं सर्वाधिक प्रभावित असणार आहे.