मुंबई: नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. तर अजूनही काही ठिकाणी पावसाचं थैमान सुरूच आहे. कोकणात अवेळी पाऊस पडत असल्याने कापलेल्या भाताच्या पेंड्यांचं नुकसान झालं आहे. आता राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढचे 3 दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 ते 15 नोव्हेंबर राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणी संलग्न मराठवाडा भाग प्रभावीत असण्याची शक्यता. काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


12 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा परिसरात पाऊस पडणार आहे. 13 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड नांदेड, लातूर उस्मानाबाद इथे 13 आणि 14 नोव्हेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागत असताना या थंडीचा विचका करण्यासाठी पावसानं खो घातला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आहे. 15 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड नांदेड, लातूर उस्मानाबाद भागात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.