पश्चिम रेल्वेचे आणखी पाच पूल धोकादायक
लोअर परळपाठोपाठ ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन आणि दादरचा टिळक पूल लवकरच बंद केले जाणार आहेत.
मुंबई: लोअर परळसह मुंबईतील सहा रेल्वे पुलांच्याबाबत पश्चिम रेल्वेने अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप मुंबई महानगरपालिकेने केला आहे.
मुंबई महापालिकेनं जीर्ण पुलांचे गांभीर्य नजरेस आणूनही गेली साडेतीन वर्ष रेल्वेने त्याबाबतीत काहीच पाऊल उचललं नाही, अशी धक्कादायक बाब कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे. झी २४ तासकडं ही कागदपत्रं उपलब्ध आहेत.
लोअर परळपाठोपाठ ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन आणि दादरचा टिळक पूल लवकरच बंद केले जाणार आहेत. या सहा पुलांच्या दुरूस्तीसाठी ८० कोटी रूपये खर्च अपेक्षित होता. मुंबई महापालिका हा खर्च उचलायला तयार होती.
मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनानं त्याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही. गेल्या दीड वर्षांपासून केवळ निविदा काढण्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले. अंधेरीचा पूल कोसळल्यानंतर मात्र पश्चिम रेल्वेला खडबडून जाग आल्याचे पालिकेने सांगितले.