एका उंदरामागे तीन हजारांचा चुराडा, पश्चिम रेल्वेचा उपद्व्याप
इथे एका उंदरामागे तीन हजारांचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई : एका उंदराची किंमत किती असू शकेल असं तुम्हाला वाटत ? मुळात उंदीर विकत घ्यायची वेळच येत नाही पण एका उंदराला मारण्यासाठी किती खर्च येतो.... हे ऐकलंत तर चक्रावून जाल..एका उंदराला मारल्यामागे दहा-वीस किंवा शेकडो रुपये खर्च होतात असं उत्तर तुम्ही द्याल. पण इथे एका उंदरामागे तीन हजारांचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेने हे शक्य करुन दाखवले आहे.
२ हजार ८०० रुपयांना एक उंदीर
तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. पश्चिम रेल्वेनं हा उपदव्याप केलाय. रुळांवर सुळसुळणाऱ्या उंदरांमुळे पश्चिम रेल्वे त्रस्त आहे. रेल्वे गाड्या, स्थानकं, रेल्वेच्या कारशेडमध्ये असलेले उंदीर वायरी कुरतडतात, त्यामुळे पश्चिम रेल्वेचं कोट्यवधींचं नुकसान होतं.
पश्चिम रेल्वेनं उंदरांना मारण्यासाठी गेल्या ३ वर्षांत दीड कोटी खर्च केलेत. साडेपाच हजार उंदीर मारण्यासाठी १ कोटी ५१ लाख खर्च झाले. एवढा खर्च करूनही पश्चिम रेल्वेला फक्त ५ हजार ४५७ उंदीर मारण्यात यश आलंय. प्रत्येक दिवसाचा हिशोब केल्यास १४ हजार खर्च करून केवळ पाचच उंदीर मेले. म्हणजे एक उंदीर मारायला २ हजार ८०० रुपये लागतायत.
रोज पाच उंदीर मारायला एक माणूस आणि उंदीर मारण्याचं औषध याला २८०० खर्च नक्कीच येत नाही. म्हणजेच हे पैसे दुसऱ्याच कुणाच्या तरी बिळात जातायत आणि हे तुमचे आमचेच पैसे आहेत. हे लक्षात ठेवा. ट्रेनमध्ये आणि ट्रेनच्या बाहेर कचरा टाकू नका. तेवढं जरी केलं तरी उंदीर कमी करायला मदत होईल.