मुंबई : देवेंद्र फडणवीसांना ३० नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करायचं आहे. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांची गरज आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडं पाच पर्याय आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणती लाईफलाईन भाजप वापरणार?


भाजपनं अजित पवारांजवळच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राच्या जोरावर राज्यात सरकार स्थापन केलं. असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांना आता बहुमताची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त पाचच लाईफलाईन आहेत. यातल्या कोणत्या एका लाईफलाईनचा फडणवीस वापर करतात. हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.


लाईफलाईन क्रमांक १


भाजपाकडं सध्या १०५ आणि १४ अपक्ष मिळून ११९ संख्याबळ आहे. अजित पवारांनी ३६ आमदारांचं पाठबळ सरकारमागं उभं केल्यास सरकार बहुमताची परीक्षा पास होण्याची शक्यता आहे.


लाईफलाईन क्रमांक २


१०५ भाजपाचे १४ अपक्ष मिळून ११९ आणि शिवसेनेचे दोन तृतियांश म्हणजे ३८ आमदार फुटल्यास सरकारची गोळाबेरीज बहुमताच्या पार म्हणजेज १५८ पर्यंत जाते.


लाईफलाईन क्रमांक ३


१०५ भाजपाचे १४ अपक्ष मिळून ११९ आणि काँग्रेसचे दोन तृतियांश आमदार म्हणजेच ३० आमदार फुटल्यास सरकारला १४९ आमदारांचं समर्थन मिळणार आहे.


लाईफलाईन क्रमांक ४


सत्तेच्या कर्नाटक पॅटर्नप्रमाणं तीनही पक्षातल्या २६ आमदारांनी पक्षादेश डावलून भाजपला मतदान करण्यासाठी तयार केलं जाऊ शकतं. यात जे अपात्र होतील त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी भाजप स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकतो.


लाईफलाईन क्रमांक ५


१०५ भाजपचे १४ अपक्ष मिळून ११९ आणि शिवसेनेचे अपक्षांसह ६३ आमदार एकत्र आल्यास सरकार १८२चा आकडा गाठू शकते. झालं गेलं गंगेला मिळालं सांगून शिवसेनेला जवळ करण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असली तरी शिवसेनेला भाजपसाठी अस्पृश्य नाही. भाजप नेते आजही उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं टाळत आहेत. भाजपकडून सध्या फक्त संजय राऊत यांनाच टार्गेट केलं जातं आहे.


राज्यातली सध्याची स्थिती पाहता सत्तेची कोणताही गणितं जमू शकतात. अजून खूप रात्री आणि खूप दिवस हातात आहेत. एवढ्या वेळेत सत्तेचं कोणतं गणित करायचं याचा विचार भाजपनं नक्कीच केला असेल.