मुंबई : शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत पहिल्यांदाच आमदार पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर, नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. वरळी मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरेंसह यावेळी अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी तयार आहोत. यावेळी अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आलो आहोत. आमदार पदाची शपथ घेताना अतिशय अभिमान वाटत होता. आम्हाला राज्याची सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. 


  


आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वरळी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. बुधवारी त्यांनी विधानभवनात आमदारपदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरेंनी विधानभवनात येण्याअगोदर प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.


बुधवारी आदित्य ठाकरेंच्या शपथविधीनंतर, गुरुवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दादर येथील शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 


गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या संत्तासंर्घात आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या महाआघाडीने एकत्र एक सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदारांची एक बैठक मंगळवारी हॉटेल ट्रायडंटमध्ये पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते म्हणून तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या ठरावाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.