परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय झालं ?
परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध त्यांनी याचिका दाखल केली होती. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.
परम बीरसिंग यांची याचिकेवर सुनावणी सुरू होताच हायकोर्टात जाण्याऐवजी सर्वोच्च न्यायालय का आलात ? असा पहिला प्रश्न न्यायमुर्तींनी विचारला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी असे न्यायमूर्ती एस. के. के कौल म्हणाले.
परमबीर सिंग यांच्या वतीने, मुकुल रोहतगी यांनी खंडपीठाला आश्वासन दिले की, आजच मुंबई उच्च न्यायालयात अप्रोच करुन उद्या सुनावणीसाठी आदेश देण्यासाठी विनंती करु असे सांगितले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून काही गोष्टी सार्वजनिक झाल्यामुळे काही लोकांची प्रतिमा खराब होत आहे असे कोर्टाने म्हटले.
काय प्रकरण ?
मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटवणे हे बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले. अंतरिम दिलासा म्हणून आपली बदली रोखावी तसेच राज्य सरकार, केंद्र आणि सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात आरोपानंतर सुनावणी होणार असल्याने काय निर्णय लागतो. तसचे याचिका फेटाळण्यात येईल की राखून ठेवली जाईल, याचीच उत्सुकता आहे.
दरम्यान, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या वादानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी अनिल देशमुख वर्षावर गेले असतील असेही बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असावी अशीही एक शक्यता आहे.