मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत बुधवारी मराठा समाजाचा महाविराट मूक मोर्चा निघाला. शांततामय मार्गानं काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी रेकॉर्डब्रेक जनसमुदाय लोटला. या मोर्चातून नेमकं काय हाती लागलं, पाहूयात हा रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा मोर्चाचं भगवं तुफान बुधवारी मुंबईत धडकलं... 'एक मराठा, एक लाख मराठा' असा यल्गार राजधानीत घुमला... 'एकच चर्चा, मराठा मोर्चा' या घोषणेचा प्रत्यय सगळ्यांना आला... 


कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ गेल्या वर्षी ९ ऑगस्टला पहिला मराठा मोर्चा निघाला. त्यानंतर वर्षभरात राज्याच्या विविध भागात लाखा-लाखांच्या गर्दीचे तब्बल ५७ मोर्चे काढण्यात आले. बुधवारी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मुंबईत निघालेल्या समारोपाच्या मोर्चात कुणी मावळ्याच्या, कुणी शिवबाच्या तर कुणी जिजाऊच्या वेशात सहभागी झाले होते. 


अत्यंत शिस्तबद्धपणं, कुठलीही घोषणाबाजी न करता हा मूकमोर्चा भायखळा जिजामाता उद्यानापासून, जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानात पोहोचला. या गर्दीच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली ती मोर्चातल्या रणरागिणींनी... कोपर्डी बलात्काऱ्यांना फासावर लटकवून पीडित मुलीला न्याय द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या दोन प्रमुख मागण्या घेऊन या रणरागिणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं.


मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...


- कोपर्डी बलात्कार खटला लवकरात लवकर निकाली काढणार


- मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग लवकर निर्णय घेणार


- ओबीसींप्रमाणं मराठा समाजासाठी 605 अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्ती


- प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह


- आणि 3 लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलं


नेत्यांना रोखलं...  


सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आझाद मैदानात उपस्थित जनसमुदायाला दिली. मात्र, सरकारच्या आश्वासनामुळं समाधान न झाल्यानं संतप्त मोर्चेकऱ्यांनी काही काळासाठी दोघांना व्यासपीठावरच रोखून धरलं. 


'न भूतो...' अशा स्वरूपाच्या या महाविराट मराठा मोर्चाची सांगता झाली. पण त्यातून मोर्चेकऱ्यांच्या हाती नेमकं काय लागलं, यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.