मुंबई : टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एक एक करत देशातील प्रत्येक राज्यात आपली सत्ता स्थापन करत असलेल्या भाजप सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. दिलेला शब्द भाजप सरकारने न पाळल्याने टीडीपीने हा निर्णय घेतला. अशात आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारच्या एनडीएमध्ये सहभागी झाल्यापासूनच शिवसेनेची भाजपकडून गळचेपी होत असल्याची ओरड सुरू आहे. हवा तो सन्मान-मान दिला जात नसल्याने शिवसेना बिथरली आहे. शिवसेनेतील अनेक नेतेही सत्तेतून बाहेर पडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आग्रही होते. काहींनी तर ‘आम्ही राजीनामा खिशात घेऊन फिरतो’ असेही डायलॉग मारले. मात्र, तो संताप लगेच ओसरला आणि पुन्हा सत्तेचा पदर धरून शिवसेना भाजपसोबत सुखाचा संसार थाटताना दिसत आहे. 


शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून वेळोवेळी भाजप सरकार आणि भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली गेली आणि करत आहे. इतकेच काय तर शिवनेनेने आगामी २०१९ च्या निवडणुकाही स्वबळावर लढण्याची बोळवण केली आहे. शिवसेनेने अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याच्या पोकळ धमक्या दिल्या असल्या तरी दुसरीकडे यावरून भाजपच्या नेत्यांनी त्यांची वेळोवेळी खिल्लीच उडवली आहे. सेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. मग अशात सर्वसामान्य नागरीक सोशल मीडियाच्या माध्यमातून सेना सत्तेतून बाहेर कधी पडेल? असा प्रश्न विचारताना दिसते आहे. 


शिवसेनेने आता इतक्यावेळा सत्तेतून बाहेर पडण्याच्या पुड्या सोडल्या आहे की, सर्वसामान्य नागरीकांनाही ते सत्तेतून बाहेर पडणार नाही, असा विश्वास आलाय. सेनेला सत्ता सोडवत नाहीये हे जवळपास भाजपसह नागरीकांनाही कळलं आहे. जर भाजपसोबत पटत नाही, तर ते सत्तेत कशासाठी आहेत? नागरीकांची अशी भुलवणी का केली जात आहे? कशासाठी वेळोवेळी नागरीकांसमोर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे सांगितले जात आहे? असे प्रश्न राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरीकही विचारत आहेत. 


खरंतर स्वाभिमान कसा असावा हे टीडीपीनं आता दाखवून दिलं आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून चंद्रबाबू नायडू यांनी केली होती. पण ही मागणी मान्य न झाल्यामुळे टीडीपीनं हा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येणार नाही तर आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज देऊ, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली होती. पण त्यांना हा प्रस्ताव मान्य नसल्याने त्यांनी राजीमाने देत एनडीएतून काढता पाय घेतला. एकप्रकारे त्यांनी पंतप्रधान मोदींनाच थेट विरोध केला हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता राज्यातील शिवसेना कधी सत्तेचा पदर सोडून आपला स्वाभिमान जपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.