मुंबई : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तमाम पक्ष कामाला लागलेत... एक सोडून... या गोंधळात काँग्रेस नेते आहेत कुठे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. निवडणुकीआधीच काँग्रेसनं पराभव मान्य केलाय का, असा सवालही विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात प्रचाराचा धुरळा उडलाय... भाजपाचे तमाम बडे नेते राज्यभरात फिरतायत... पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जवळजवळ एक दिवसाआड महाराष्ट्रात येतायत... पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे दौरे करतायत... 'अँग्री यंग मॅन' शरद पवार आपलं वय विसरून राज्यभर फिरतायत.


मात्र या रणधुमाळीत दीडशे वर्षं जुना पक्ष कुठेच दिसत नाही. चर्चा झालीच, तर ती होते राहुल गांधी परदेशात निघून गेल्याची किंवा नेत्यांनी आपल्याच पक्षावर केलेल्या टीकेची.


नेत्यांमध्ये समन्वय नाही. सुशीलकुमार शिंदेंसारखे जुने-जाणते नेते अचानक विलिनीकरणाचं भाकीत करून पक्षाचा मुखभंग करतायत... 


राज्यातले नेते आपापल्या मतदारसंघात अडकून पडलेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचं प्राधान्य संगमनेर जिंकण्याला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आपापल्या मतदारसंघात अडकून पडलेत. 


मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड मुलीच्या प्रचारात आहेत. त्यांना मुंबईकडे लक्ष द्यायला वेळ नाही. माजी अध्यक्ष मिलिंद देवरा गायब आहेत आणि ट्विटरवर केंद्र सरकारचं कौतूक करतायत.


दुसरे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपण कोणत्याही क्षणी पक्ष सोडू, असं जाहीरच करून टाकलंय. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातून येऊन फडणवीसांसाठी मतं मागत असताना राजस्थान, मध्यप्रदेश या जवळच्या राज्यांचे मुख्यमंत्री अद्याप फिरकलेले नाहीत.


कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, असं चित्र काँग्रेसमध्ये आहे... पक्षानं लढाईपूर्वीच आपली तलवार म्यान केलीये का, असा सवाल यामुळे उपस्थित होतोय.