धनंजय मुंडेवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण ? काय केलेयत आरोप ?
धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर २००६ पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी झी २४ तासकडे यासंदर्भात खुलासा करत सर्व आरोप फेटाळलेयत. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केलाय.
धनंजय मुंडे यांनी माझ्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. तुला बॉलिवूडमध्ये मोठ्या निर्मात्यांशी भेट घालून देईन आणि काम मिळवून देईन असे आश्वासन दिले असा आरोप रेणूनं केलाय.
कोण आहे रेणू शर्मा ?
रेणु शर्मा ही बॉलिवूड गायिका आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ती 1997 साली आपल्या इंदौरच्या घरी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा भेटली होती. 1998 साली धनंजय मुंडे यांनी बहिण करुणा हिच्याशी लग्न केल्याचे रेणूचं म्हणणं आहे. लग्नाच्या बहाण्याने आपल्या बहिणीशी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप तिने केलाय. धनंजय मुंडेंनी 2012 मध्ये एनसीपीमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेत्यांकडे मदतीची साद
या तरूणीने पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.