ShivSena vs MNS : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरवर एक  व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला (ShivSena) डिवचलं आहे. हा व्हीडिओ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्यांबाबात ठाम भूमिका घेताना दिसत आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही' अशी रोखठोक भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलीहोती. राज ठाकरेंनी नेमका हाच व्हिडिओ ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भलतीच कोंडी केलीय... यातून राज ठाकरेंनी भविष्यातील राजकारणाची दिशाच स्पष्ट केलीय.


काय आहे राज ठाकरेंची रणनीती? 


1 : खरा वारसदार कोण?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसदार आपणच आहोत, असं बिंबवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय. मनसेनं कट्टर हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही मूळ बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका आहे, हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे...


2 : मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर?
मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा विसर पडलाय, हेच दाखवून देण्याचा राज ठाकरेंचा खटाटोप आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री मवाळ झालेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेच.


3 : आधी भोंगा, मग रस्त्यावरील नमाज?
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे आणि मनसे आक्रमक झालीय. भविष्यात रस्त्यावर पढली जाणारी नमाज बंद व्हावी, यासाठी राज ठाकरे आंदोलन सुरू करतील, अशी शक्यता आहे.


तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं ऐकणार की, शरद पवारांचं? असा तिखट सवाल राज ठाकरेंनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भोंग्यांबाबतच्या पत्रकात केला होता. त्यावरून पुन्हा शिवसेना विरुद्ध मनसे सामना रंगलाय..


महाराष्ट्रात ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई सुरू झालीय. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसदार कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की हिंदूजननायक राज ठाकरे? असा सवाल पुन्हा उपस्थित झालाय.