मुंबई : १३ दिवस झाले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नाहीय.... सेना-भाजपाच्या अशाच वेळकाढूपणामुळे एकदा सरकार होता होता निसटलंय... आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का... १९९९ साली विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदरच आणि लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक घेतली गेली. तेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते नारायण राणे... सोनियांच्या परदेशी मुळाच्या मुद्द्यावर पवारांनी नुकतीच 'राष्ट्रवादी काँग्रेस' नावाची वेगळी चूल मांडली होती. अशा वातावरणात निवडणुका पार पडल्या.


१९९९ साली संख्याबळ असं होतं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस - ७५


राष्ट्रवादी काँग्रेस - ५८


शिवसेना - ६९


भाजपा - ५६


इतर - ३०


युतीची सत्ता यावी म्हणून प्रयत्न सुरू होते. तेव्हा कमी जागा भाजपाच्या होत्या... पण मुंडेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असं म्हणतात. म्हणून भाजपानं तब्बल २१ दिवस वेळकाढूपणा केला. नुकतेच वेगळे झालेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, असा निवडून आलेल्या अपक्षांचा अंदाज होता, त्यामुळे अपक्षांनी युतीला पाठिंबा देण्याची तयारी केली होती. पण तेव्हा भाजपाच्या वेळकाढू धोरणामुळे अखेर राज्यातली सत्ता फिरली. तेव्हाही पवार सोनियांच्या दारी गेले... अन् गेम पलटला... राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली... आणि विलासराव मुख्यमंत्री झाले. 



आता तब्बल २० वर्षानंतर... पुन्हा तेच... तोच वेळकाढूपणा... महायुतीतच लढलेल्या भाजपा-शिवसेनेकडे संख्याबळ आहे पण मुख्यमंत्रीपदावरुन अडलंय... कमी जागा असताना शिवसेनेला मुख्यमंत्री हवाय... भाजपा-शिवसेनेचा पुन्हा वेळकाढूपणा सुरू असताना तिकडे पवार सोनियांकडे एकदा जाऊन आलेत... पुन्हा जाणार आहेत... इतिहासाची पुनरावृत्ती होणार की वेगळा इतिहास घडणार? याकडे मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्याही नागरिकांचं लक्ष लागलंय.