मुंबई: नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी पर्याय कोण याचं उत्तर देण्यासाठी देशातील जनता सुज्ञ आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. मुंबईत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असे भाकीत वर्तवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


2004 साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा देशभरात शायनिंग इंडियाची धूम होती. मात्र, त्यावेळी समविचारी पक्षांनी सत्तेवर येत पुढील दहा वर्षे राज्य केले, या वस्तुस्थितीकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एखाद्या पक्षाकडून सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर लोक जास्त काळ बघ्याची भूमिका घेत नसतात. ते योग्य तो निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक राज्यात योग्य पर्याय देण्याचा आणि एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये यश आल्यास जनतेला पर्याय देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. असे पवारांनी म्हटले. २०१९ मध्ये ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील, त्यांचाच पंतप्रधान होईल, असेही पवारांनी सांगितले.