Maharashtra Political Crisis : ठाण्याचा किल्लेदार आणि शिवसेनेचा शिलेदार ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ओळख. पण आता हाच शिलेदार थेट सरसेनापती होण्यासाठी पुढं सरसावलाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख आहेत. पण ठाकरे घराण्यानंतर शिवसेनेत सर्वात बलवान कोण असेल तर ते एकनाथ शिंदेच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याचं मान्य केलं नसतं तर एकनाथ शिंदेच सत्तासिंहासनावर बसले असते, अशी चर्चा आहे. मात्र आता अडीच वर्षांनी शिवसेना आमदारांमध्ये उभी फूट पाडून शिंदेंनी ठाकरेंच्या सिंहासनालाच जोरदार दणका दिला आहे.


कुणाकडे किती संख्याबळ?
सध्या एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 37 आमदार आहेत. त्याशिवाय 4 अपक्ष आमदारही गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेंकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरेंकडे जेमतेम 18 आमदारच उरलेत


उद्धव ठाकरे यांना सोडून एवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत का फुटले, असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. पण त्याचं उत्तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात सापडतं.


शिंदेंसोबत शिवसेना आमदार का गेले? 
गेली अडीच वर्षं 'वर्षा' बंगल्याची दारं शिवसेनेच्या आमदारांना बंद होती. बंगल्यात प्रवेश करण्यासाठी लोकांमधून निवडून न येणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हेच बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. 


त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. अयोध्येत जाण्यापासून आम्हाला का रोखलं? आमच्यावर इतका अविश्वास का? याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दरवाजा उघडा होता. आमची सर्व गा-हाणी फक्त शिंदे साहेबच ऐकत होते. त्यामुळं सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला, असं शिरसाटांनी निक्षून सांगितलं.


चार टर्म आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंना बंड करायला शिवसेना आमदारांनीच भाग पाडलं, असा या पत्राचा सूर आहे. 1980 मध्ये धर्मवीर आनंद दिघेंचं बोट धरून शिंदे राजकारणात आले. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून ठाण्यात आलेल्या शिंदेंनी पोटापाण्यासाठी रिक्षा चालवली. आता याच रिक्षाचालकानं महाविकास आघाडीच्या तीन चाकी रिक्षाला ब्रेक लावलाय. एवढंच नाही तर अख्खी शिवसेनाच ठाकरेंकडून ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. या सिंहासनाच्या लढाईत ते ठाकरेंना मात देऊ शकतील का? घोडामैदान फार दूर नाही.