मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सतत चर्चेत आहे. एनसीबीच्या मोठ्या कारवाईत आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात सापडला होता. 
एनसीबीनं केलेल्या (NCB) कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. जवळपास 25 दिवसांनंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादांनंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखला मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आर्यन खानच्या जामीनची ऑर्डर सत्र न्यायालयात पोहोचली आणि त्याच्या वाटा मोकळ्या झाल्या.


अभिनेत्री जुही चावला हिनं हमीदार होत आर्यनच्या जामीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आणि न्यायालयानंही ही बाब मंजूर केली होती. पण, अखेर त्याची सुटका होणं मात्र लांबणीवर गेलं. 


मुलाला घेण्यासाठी खुद्द शाहरुख खान आर्थर रोड कारागृह परिसरात पोहोचल्याचं म्हटलं गेलं. पण, जामीनाची प्रत कारागृहातील पेटीत निर्धारित वेळमर्यादेत न पोहोचल्यामुळे आर्यनची सुटका लांबली. 


जामीन अर्जाची प्रत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळं त्याची आणखी एक रात्र कारागृहातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं.कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी झी 24 तासला माहिती देत स्पष्ट केलं. दरम्यान, आर्यन खानसाठी न्यायालयाकडून पाच पानांची ऑर्डर जारी करण्यात आली होती. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. 


सायंकाळी साडेपाच वाजण्यापर्यंत आर्यनच्या जामीनाची प्रत कारागृहाबाहेरील पेटीत पोहोचणं अपेक्षित होती. पण, तसं होऊ शकलेलं नाही. ज्यामुळे शाहरुखच्या मुलाची घरवापसी लांबली. आता शनिवारी कारागृहाच्या नियमांनुसार पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये अर्जाची प्रत पडल्यानंतरच आर्यनची सुटका होणार आहे.