परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण
परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.
मुंबई : देशात सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. मात्र, परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली. परंतु ही एवढी मोठी होण्यामागे नक्की कारण काय, असा सगळ्यांनाच प्रश्न होता. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता ही पेट्रोल चालकांची मनमानी असल्याचे पुढे आलेय.
देशातील पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख वापराच्या इंधनांच्या दरात गेले 17 दिवस सलग वाढ होत हा आकडा नव्वदीकडे झुकलाय. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलने नव्वदीही ओलांडली असून लवकरच ते शतक गाठण्याची भीती आहे. याचे दुष्परिणाम चहूबाजूंनी दिसत आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीचा परिणाम हा महागाईवर दिसून येत आहे. साऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत झालेली वाढ चिंताजनक आहे. इंधन भडक्याने अधिकच चटके सगळ्यांनाच बसत आहेत.
देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीत तर पेट्रोलच्या किंमतीनं नव्वदी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.८९ रुपये तर डिझेल ७७.०९ रुपयांवर पोहोचले आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत परभणीत (८९.९९ रुपये प्रति लिटर) सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. तर डिझेल (७७.८ रुपये प्रति लिटर), धुळ्यात पेट्रोलचा दर (८७.९४ रुपये प्रति लिटर) आहे.
मात्र, परभणीत इंधर महाग असण्याचे खरं कारण हे आहे. संपूर्ण मराठवाड्यात इंधन साठविण्यासाठी डेपोच नाही. त्यामुळे इंधनाचा साठा करता येत नाही. परिणामी उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भातून इंधन आणावे लागते. मात्र, विदर्भातून इंधन आणण्यासाठी जास्तीचा खर्च येतो.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून नाशिक-मनमाड येथून 350 किमी अंतरावरुन इंधन आणावे लागते. त्यामुळे हा खर्च वसूल करण्यासाठी पेट्रोल-डिझेल पंप मालक पेट्रोल आणि डिझेलमध्ये समाविष्ठ करतात. त्यामुळे या ठिकाणी देशाच्या तुलनेत सर्वाधिक जास्त दर इंधनासाठी द्यावा लागत आहे. इंधन पंप चालक सामांन्याना दरवाढ करुन वेठीस धरत असल्याचे पुढे आलेय. त्यामुळे मराठवाड्यात इंधन साठविण्यासाठी डेपोची मागणी होत आहे.