विधानसभा निवडणुकीत का आहे सर्व पक्षांचा मुंबईवर डोळा?
मुंबईत कोण मारणार बाजी ?
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : विधानसभेच्या सर्वाधिक ३६ जागा या मुंबईत आहेत. २०१४ ला वेगवेगळे लढूनही सर्वाधिक जागा भाजप शिवसेनेनं जिंकल्या होत्या. आतातर या दोन्ही पक्षांची झालेली युती आणि दुबळी पडलेली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, याचा फायदा युतीलाच अधिक होणार आहे.
विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी सर्वाधिक ३६ जागा या एकट्या मुंबईत असल्यानं सर्वच राजकीय पक्ष मुंबईवर लक्ष केंद्रीत करून इथं ताकद लावतात. २०१४ पर्यंत मुंबईत काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या सोबतीनं राष्ट्रवादीही इथं काही ठिकाणी तग धरून होती. परंतु २०१४ नंतर मात्र चित्र बदलण्यास सुरूवात झाली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होवून भाजप-शिवसेनेची ताकद वाढायला लागली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चारही पक्ष स्वबळावर लढूनही एकूण ३६ जागांपैकी भाजपनं १५ तर शिवसेनेनं १४ ठिकाणी विजयी मिळवला. तर दुसरीकडं काँग्रेसला ५ जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएम प्रत्येकी एका जागेवर विजयी मिळवला आहे. यानंतर २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येही स्वबळावर लढलेल्या शिवसेना भाजपनं एकूण २२७ पैकी अनुक्रमे ८४ आणि ८३ जागा जिंकल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मिळून ३९ जागा जिंकल्या. तसंच २०१९ मध्ये मुंबईतील लोकसभेच्या सर्व ६ जागा शिवसेना भाजपनं जिंकल्यामुळं युतीची ताकद वाढली. त्यातच काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळं मिलिंद देवरा, संजय निरूपम, जनार्दन चांदूरकर प्रचारापासून दूरच राहिलेत. तर दुसरीकडं सचिन अहिर, संजय दिना पाटील यांनी शिवसेनेची वाट धरल्यानं नवाब मलिक वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत चेहराच उऱलेला नाही.
भाजप आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीचा सर्वाधिक फायदा या दोन्ही पक्षांना मुंबईत होणार आहे. कारण मुंबईत या दोन्ही पक्षांची सर्वाधिक ताकद आहे. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीकडं काही जागांचा अपवाद वगळता तुल्यबळ उमेदवारांची वानवा दिसते आहे. मुंबईत शिवसेना १९ जागांवर तर भाजप १७ जागांवर लढत आहे. तसंच काँग्रेस तब्बल २९ जागांवर लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस ६ जागांवर लढत आहे.
समाजवादी पक्ष, एआयएमआयएम तसंच बहुजन वंचित आघाडीचे उमेदवारही इथून नशिब आजमावत आहेत. असं असलं तरी राज्यासह सर्व देशाचे लक्ष लागलंय ते मुंबईतल्या एकमेव लढतीकडं. ती लढत म्हणजे वरळीची, कारण येथून ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत. यासह मुंबईतील आणखीही काही लढती रंगतदार होत आहेत. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्वमधून शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत आणि शिवसेना उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यातील लढत रोमहर्षक होते आहे. वर्सोवा येथील शिवसेना बंडखोर राजूल पटेल आणि भाजपच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्यातील लढत अटीतटीची होते आहे.
भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव, काँग्रेसचे मधु चव्हाण, एआयएमआयएमचे वारिस पठाण आणि अभासेच्या गीता गवळी यांच्यातील चौरंगी लढत चुरशीची होते आहे. कुलाब्यात भाजपचे राहूल नार्वेकर आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यातही रंगतदार लढत होते आहे.
सध्या प्रचार रंगत असला तरी यामध्ये काही मुद्दे सोडले तर इतर प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही आहे. मुंबईत सध्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेला मुद्दा आहे तो आरे कारशेडच्या जमिनीचा. त्यानंतर मुद्दा आहे पीएमसी बँक घोटाळ्याचा. तसंच जुन्या इमारतींचा पुनर्विकास, अर्धवट राहिलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, बीडीडी चाळी आणि धारावी पुनर्विकास प्रश्न, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, रेल्वे वाहतूक हे प्रश्न तितकेसे चर्चेत नाहीत.
दुसरीकडं सत्ताधारी मुंबईत होत असलेली मेट्रोची कामे, कोस्टल रोड, शिवडी न्हावाशेवा लिंक या कामांचे श्रेय घेण्यात आघाडीवर आहेत.