मुंबई: भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेल्या वादात आता नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत या मुद्द्यावरून कालपासून भाजपला लक्ष्य करत आहेत. मात्र, निलेश राणे यांनी एक बिनतोड सवाल विचारत संजय राऊत यांना कोंडीत पकडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश राणे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाचे छायाचित्र ट्विट केले आहे. सेना भवनात आमच्या महाराजांपेक्षा स्व. बाळासाहेबांना वरचे स्थान का दिले? संजय राऊत यावर कधी बोलणार?, असा सवाल निलेश राणे उपस्थित केला आहे. या छायाचित्रात शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या अडचणीच्या प्रश्नाला आता शिवसेना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


'उद्धवजी राऊतांच्या जिभेला लगाम घाला, मुजोरी खपवून घेणार नाही'


याशिवाय, निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे. मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राणे परिवारामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. 


तत्पूर्वी संजय राऊत यांना छत्रपती संभाजीराजे यांनीही खडे बोल सुनावले होते. मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना करणे सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का, असा सवाल राऊतांनी विचारला होता. 




या टीकेला प्रत्युत्तर देताना संभाजीराजे यांनी राऊतांना करड्या शब्दांत समज दिली होती. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना करड्या शब्दात समज दिली आहे. उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.