मुंबई : संपकरी एसटी कामगारांनी (ST Worker Strike) काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून आंदोलन केलं होतं. या घटनेनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. याप्रकरणी एसटी कामगारांचं नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि 109 एसटी कामगारांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यामागचं नेमकं कारण आज शरद पवार यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही, ते कामगार आहेत, त्या मागण्यांसाठी ते महिनो महिने बसले होते. त्यांना चुकीचं नेतृत्व लाभलं, चुकीच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीची भाषणं केली ज्या पद्धतीची टीका केली. त्यांच्या टीकेचा रोख एक व्यक्ती असा होता, राज्य सरकारचा उल्लेख नाही, एसटी महामंडळाचा उल्लेख नाही, फक्त सातत्याने माझं नाव घेऊन त्या कष्टकरी कामगारांच्या डोक्यात भरवलं गेलं, त्याचा हा परिणाम आहे आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 


माझ्या मते कामगारांना दोष देऊन चालणार नाही, त्यांना रस्त्यावर आणण्याची भूमिका घेणारे जे कोणी घटक असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 


हल्ल्याच्या आदल्या दिवशी कोर्टात निकाल लागला, तो निकाल लागल्यानंतर तो आपल्या बाजूने लागला असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी हल्ल्याची घटना घडली याचा अर्थ काय,  याचा अर्थ एकच आहे जे चमत्कारीक नेतृत्व आहे त्यांनी एका व्यक्तीच्याविरोधात विद्वेश बिंबवण्याचा प्रयत्न केला,त्याची ही प्रतिक्रिया आहे असं शरद पवार यांनी म्हटलं.