मुंबई: गणेशोत्सवासाठी रेल्वे विशेष गाड्या सोडायला तयार असतानाही त्या नाकारून महाविकासआघाडी सरकारने कोकणी माणसाचे हाल का केले, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवावासाठी कोकणात येणाऱ्या लोकांवर राज्य सरकारकडून क्वारंटाईनसह काही निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरुन विरोधी पक्ष असलेला भाजप सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आशिष शेलार यांनी ट्विट करुन सरकारला धारेवर धरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शिवसेनेने कोकणवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्यात, किंमत मोजावी लागेल'

आशिष शेलार यांनी म्हटले की, रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला हा राग काढला?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. 



कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी 'या' दिवसापासून एसटी बसेस उपलब्ध

सुरुवातीच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाईन कालवाधी सक्तीचा होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच सरकारने हा कालवाधी १० दिवसांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी विशेष एसटी बसेसची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत गणेशोत्सवासाठी कोकणात बाहेरून जवळपास तीन लाख लोक दाखल झाले आहेत. यामुळे कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली होती. मात्र, आपण योग्य ती खबरदारी घेत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते.