पंकजा मुंडे खरेच बंड करणार का?
पंकजा मुंडे कोणता झेंडा हाती घेणार, पंकजा मुंडे खरंच बंड करणार का, पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय, असे बरेच प्रश्न महाराष्ट्राला पडलेत.
मुंबई : पंकजा मुंडे कोणता झेंडा हाती घेणार, पंकजा मुंडे खरंच बंड करणार का. पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय, असे बरेच प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेत. कारण गेले दोन दिवस पंकजा मुंडे या अस्वस्थ अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहेत. मनातली खदखद फेसबुकवरुन व्यक्त करुन झाल्यावर आता पंकजा मुंडेंनी लगेचच ट्विटर अकाऊंटवरुन भाजप हा उल्लेख डिलीट केलाय. पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिट्विट केले आणि...
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला त्यावेळी देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहीण मानून त्यांच्याविरोधात परळीमधून उमेदवार दिला नव्हता.
लोकसभा निवडणुकीतही प्रितम मुंडे यांच्यासाठी बीड जिल्ह्यात शिवसेनेनं सगळी फौज उभी केली होती. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळेच पंकजा यांचा पराभव झाल्याची कुजबूज परळीत आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत गेल्या तर शिवसेनेला सक्षम महिला आणि ओबीसी चेहरा मिळणार आहे
शिवसेनेची मराठवाड्यातली ताकद आणखी वाढेल आताच्या परिस्थितीत पंकजांचा शिवसेनेत प्रवेश झाला तर भाजपला सुरुंग लागू शकतो
पंकजा मुंडे नाराज असलेल्या बातम्यांमुळे भाजपच्या गोटात मात्र धावपळ झाली आणि त्या आमच्याच असल्याचा दावा भाजप नेत्यांना करावा लागला. पंकजा मोठा निर्णय घेणार, हे स्पष्ट आहे. १० दिवस त्यांनी स्वतःशी संवाद साधायला आणि कार्यकर्त्यांना विचार करायला दिलेत. आता पंकजा थेट पक्षांतर करणार, फडणवीसांविरोधा वेगळा गट स्थापन करणार की ही पंकजांची पक्षांतर्गत दवाबाची खेळी आहे हे १२ डिसेंबरलाच कळणार आहे.