दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील रस्त्यांची दुरावस्था असून अनेक रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रीड तयार करून विकास करणार असून ही कामं पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून कर्जउभारणी करण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली. विधानसभेत सार्वजनिक बांधकाम विभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या एनएचएआयच्या माध्यमातून सुरू असलेली राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे गेल्‍या दीड वर्षांत ठप्प आहेत. मराठवाडयाला त्‍याचा जास्‍त फटका बसला आहे. मराठवाडयातील २२ पैकी १७ पॅकेजेस बंद आहेत. ही बंद पडलेली कामं लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकर यांना करण्यात येणार असल्‍याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यात नव्या रस्त्यांची कामं हाती घेण्यापेक्षा अपूर्ण असलेली रस्‍त्‍यांची कामं पूर्ण करण्यास प्राथमिकता देणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.


रेती घाटांवर टोल सुरू होणार


रेतीघाटांपासून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक्‍समुळे रस्‍त्‍यांची दुरावस्‍था होत असते. वर्षभरातच नवीन रस्‍ता खराब होतो. ओव्हरलोडिंगचीही समस्‍या यात आहेच. त्‍यामुळे आता रेतीघाटांवर रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल लावण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. केवळ रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनच हा टोल घेण्यात येईल. यातून मिळणाऱ्या निधीतून त्‍या-त्‍या भागात सिमेंट रस्‍ते बांधण्यात येणार असल्‍याचेही अशोक चव्हाण म्‍हणाले.
 


टोल बंद केल्‍याने पर्यायी मार्गाने पैसे उभारावे लागतील


टोल बंद करण्यात आल्‍याने तिजोरीवर भार आला आहे. त्‍याचसोबत कॉन्ट्रॅक्‍टर यांचीही अडचण झाली आहे. सर्वांची बैठक घेउन हा प्रश्न सोडवावा लागेल. टोल बंद झाल्‍याने आलेला आर्थिक भार दूर करण्यासाठी अन्य मार्गाने पैसे उभारावे लागतील असेही अशोक चव्हाण म्‍हणाले.


पोलिसांसाठी नवीन घरे


पोलिसांच्या अनेक इमारती या मोडकळीला आल्‍या आहेत ही वस्‍तुस्‍थिती आहे. ज्‍या इमारती धोकादायक झालेल्‍या असतील त्‍या पाडण्यात येतील व नवीन इमारती उभारण्यात येतील. त्‍यासाठी ८५० कोटींचा निधी देण्याची तयारी गृहविभागाने दर्शविली असल्‍याचेही अशोक चव्हाण म्‍हणाले.


शिर्डी व इतर देवस्‍थानांशी संबंधित रस्‍त्‍यांचा विकास


राज्‍यात शिर्डी देवस्‍थानात जगभरातून भाविक येत असतात. शिर्डी प्रमाणेच इतरही देवस्‍थानांमध्ये भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. या देवस्‍थानांना जाण्यासाठी असणारे रस्‍ते अरुंद आहेत. तिथे वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी असते. त्‍यामुळे देवस्‍थानांनजीकच्या रस्‍त्‍यांना प्राधान्य देण्यात येणार असल्‍याचेही अशोक चव्हाण म्‍हणाले. कोकणातील कोस्‍टलरोडलाही गती देण्यात येत असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच कोकणातील साकव बांधण्यासाठी जास्‍तीचा निधी देण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.