उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कस लागणार
ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे.
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा उद्यापासून खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. उद्यापासून नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, स्थगित केलेले प्रकल्प, खातेपाटप यांसारख्या मुदद्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातली दरी वाढवण्याचा भाजपचा अधिवेशनात प्रयत्न असेल. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दलही भाजपने आक्रमक भूमिका घेण्याचं सुतोवाच केलं आहे. निवडणुकीपूर्वीची वक्तव्ये किंवा आश्वासनांची सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली जाईल असं भाजपने म्हटलं आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष अर्थात भाजपनं सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनिती आखलीय आहे. दरम्यान आज दुपारी दीड वाजता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यातून विरोधकांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.