ऑफिसाचा शेवटचा दिवस तिच्यासाठी ठरला आयुष्याचा शेवट...
एलफिस्टन परळ दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला.
मुंबई : एलफिस्टन परळ दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यात तेरेसा फर्नांडिस-पॉल या परळमध्ये राहणाऱ्या महिलेचा देखील समावेश आहे. नेहमीप्रमाणे ती शुक्रवारी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघाली. आज लोअर परळमधील ऑफिसचा तिचा शेवटचा दिवस होता. सोमवारपासून तिचे ऑफिस साकीनाक्याला शिफ्ट होणार होते. मात्र नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट होण्यापूर्वीच तिला मृत्यूने गाठले. या सगळ्यात दुर्दैव असं की तिला ८ महिन्याचं लहान बाळ आहे आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत.
लोअर परळमधील एका ख्यातनाम अॅड एजन्सीमध्ये तेरेसा फर्नांडिस पॉल काम करत होत्या. त्यांचे ऑफिस साकीनाका येथे शिफ्ट होणार होते. ऑफीसमधील बहुसंख्य कर्मचारी साकीनाक्यात शिफ्ट झाले होते. तर तेरेसा फर्नांडिससह काही मोजके लोक लोअर परळच्या ऑफीसमध्ये होते. ऑफीसचे कोणते डिपार्टमेंट कधी शिफ्ट होणार हे तिनेच प्रत्येकाला ई-मेलद्वारे कळवले होते.
ऑफिसमध्ये जायला निघालेल्या तेरेसा फर्नांडिस एल्फिन्स्टनच्या पुलावर आली. मात्र आज सकाळी एलफिस्टन परळ पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत तेरेसाचा मृत्यू झाला.