दादर रेल्वे स्थानकातच प्रसुती झालेली महिला रुग्णालयातून फरार
गीता वाघरे बाळासह गायब झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय
मुंबई : दादर रेल्वे स्थानकात गेल्या सोमवारी फलाटावरच गीता वाघरे नावाच्या महिलेची प्रसुती झाली. मात्र सायन रुग्णालयात उपचार घेत असताना ती महिला आपल्या तान्हुल्या बाळासह पळून गेल्यानं एकच खळबळ उडालीय. गीता वाघरे असं या २१ वर्षांच्या महिलेचं नाव आहे. गेल्या २४ डिसेंबरला ती रेल्वे स्थानकात बाळंत झाली. त्यानंतर तिला आणि बाळाला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र काल ती बाळासह गायब झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. त्यात सोबत कागदपत्रंही घेऊन ती पळाल्यानं तिचा पत्ताही कुणाला सापडत नाहीय.
दादर रेल्वे स्थानकातच या २१ वर्षीय महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या. या महिलेसोबत तिचा पती आणि दोन लहान मुलंही होती. लोहमार्ग पोलिसांनी प्रसंगावधान राखत या महिलेला तत्काळ मदत पुरविली... महिला पोलिसांनी गिताला तत्काळ आश्रय देत चारही बाजुंनी चादरीनं आडोसा उपलब्ध करून दिला... त्यामुळे, दादर रेल्वे स्थानकातच या महिलेची सुखरुप प्रसुती पार पडली.
त्यानंतर महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला सायन रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गिता हॉस्पीटलमधून अचानक गायब झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत.