MSEB च्या कर्मचाऱ्यांना 440 वोल्टचा झटका परवडेल, पण या महिलेचा नाही : Video
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर महिलेची दादागिरी
प्रथमेश तावडे, झी मीडिया,विरार : लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना MSEB च्या वीज प्रश्नांना सामोरं जावं लागलं. हाच राग अजूनही सामान्यांच्या मनात आहे. त्याचा उद्रेक आपल्याला विरारमध्ये पाहायला मिळाला. वीज मीटर कापल्याच्या रागाने एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर चांगलीच दादागिरी केली आहे. (Woman hold back the MSEB staff for Electricity Issue at Virar ) या महिलेने दादागिरी करून MSEB कर्मचाऱ्यांना मीटररूम मध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार विरार मध्ये घडला आहे.
विरार पूर्वेच्या पाचपायरी परिसरातील गोविंद एकता या सोसायटीत हा प्रकार घडला आहे. महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा एका महिलेशी वाद झाला. या महिलेने आपले थकीत वीजबील भरले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिचा वीजमीटर कापण्यास सुरुवात केली.
मग काय? या महिलेचा संताप अनावर झाला व तिने चक्क मीटररूम मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेररून टाळे ठोकले. हे दोन कर्मचारी लॉक खोलण्यासाठी महिलेकडे बऱ्याच विनवण्या करीत होते. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हा सर्व गोंधळ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विरारच्या सोसायटीत आल्यापासून MSEB च्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. महिलेने कर्मचाऱ्यांना मीटर बॉक्सच्या परिसरात लॉक केलं आहे. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. कोरोनाने जवळपास दोन वर्षे सामान्यांना वेढीस धरलं आहे. एका बाजूला बेरोजगार आणि दुसऱ्या बाजूला MSEB ची बिलं. अशा कात्रीत अडकलेल्या महिलेने आपला राग व्यक्त केला आहे.