प्रशांत अंकुशराव, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. घरकाम करुन त्या आपल्या मुलांचा सांभाळ करत होत्या. मात्र या घटनेमुळे तीन मुलांवरील आईची सावली कायमची हरपलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंबूरच्या पांजरपोळ गौतम नगर परिसरातील झोपडपट्टीतील आठ बाय आठच्या घरात राहणा-या घोडेस्वार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत सामान्य आणि गरीबीच्या परिस्थितीत राहणा-या शारदा घोडेस्वार यांचा गुरुवारी अंगावर नारळाचं झाड कोसळून दु्र्दैवी मृत्यू झाला.


गेल्या काही वर्षांपासून पती घरापासून दूर गेल्यानंतर संसार आणि मुलांची जबाबदारी शारदा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. घरोघरी धुणीभांडी करत त्यातून मिळणा-या उत्पन्नातून त्या घराचा गाडा कसाबसा हाकत होत्या.


बारावीत शिकणारा सुमित, दहावीत शिकणारा सुशांत आणि सातवीत शिकणारी स्वप्नाली यांच्या शिक्षणासाठी शारदा घोडेस्वार काबाडकष्ट करत होत्या. मात्र शारदा घोडेस्वार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर आघात कोसळलाय.


आईच्या अकाली जाण्यानं तिन्ही मुलांचं जीवन अंधकारमय झालंय. त्यातच घटना घडल्यानंतरही मुंबई पालिका किंवा सरकारकडून ना कोणती मदत मिळाली ना कुठलं आश्वासन...


चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या महिलेचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. आता अवघ्या सहा महिन्यात अशाच एका घटनेत शारदा घोडेस्वार यांचा नाहक जीव गेलाय. त्यामुळे पालिकेचे उद्यान विभाग करतं काय असा सवाल उपस्थित होतोय.