प्रवीण दाभोळकर, झी २४ तास, मुंबई : ८ जून हा दिवस जागतिक सागर दिन म्हणून साजरा केला जातोय. मुंबईतील सागरी किनाऱ्यांवर असंख्य सागरी जीव तग धरुन आहेत. इथले समुद्रकिनारे या जीवसृष्टीसाठी पोषक नसले तरीही परिस्थितीशी जुळवून घेत ते आपली वाढ करत आहेत. मानवी हस्तक्षेप, सांडपाणी, प्लास्टिक कचरा, अशा विविध कारणांमुळे मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित होत आहे. याचा परिणाम सागरी जिवांवर होतोय. साधारण ७० टक्के प्राणवायू हा समुद्रातून येतो. त्यामुळे समुद्र वाचवणं गरजेचं आहे. म्हणून समुद्र किनाऱ्यांवरची शहरं आणि गावांत राहणाऱ्यांना सागरी जिवांविषयी माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांना सागरी जिवांची सफर घडवत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुंबईच्या किनाऱ्यांवर चांगली जैवविविधता आहे हे लोकांना कळायला हवं, हा मरिन लाईफ ऑफ मुंबईचा उद्देश आहे, असं मरिन लाईफ ऑफ मुंबईचे संस्थापक प्रदीप पाताडे म्हणतात. तर किनाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन विकासाचा विचार केला तरच किनारे सुरक्षित राहतील, असं समुद्र विज्ञान अभ्यासक अभिषेक साटम यांचं म्हणणं आहे.


मुंबईत खडकाळ, वालुकामय आणि दलदल असे तीन प्रकारचे समुद्रकिनारे आहेत. अधिवासाप्रमाणे प्राण्यांच्या प्रजातीही थोड्याफार फरकानं बदलत जातात. मरिन लाईफ ऑफ मुंबईच्या स्वयंसेवकांनी इथल्या अनेक प्रजाती कॅमेऱ्यात टीपल्या आहेत. इथल्या खडकांवर ऊन घ्यायला आलेला खेकडा कधी दिसतो तर दुर्मिळ मानला जाणारा आणि रात्री संचार करणारा मांसाहारी ऑक्टोपसही यांच्या नजरेतून सुटलेला नाही. ऑक्टोपसची मादी एका वेळेला साधारणत: १ ते ५ लाख अंडी देते. तर दुर्मिळ अशी प्रवाळही इथे आढळते.  


यासोबतच सी हॉर्स, पाइप फिश, स्टार फिश, लॉबस्टर, कुर्ली, मडकॅब, समुद्री गोगलगाई असे साधारण साडे तीनशे प्रकारचे जीव मुंबई किनाऱ्यावर आढळतात. निसर्गाच्या जैवविविध साखळीत या प्रत्येकाचं स्थान महत्त्वाचं आहे.