COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी महाराष्ट्रात लागू झालेल्या प्लास्टिक बंदी संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदी किती महत्वाची आहे या बद्दल जनजागृती करण्यासाठी सामाजिक संगठनांनी ही पुढाकार घेतला आहे. वरळी इथल्या शिव सह्याद्री फाउंडेशन मार्फ़त "घरातील प्लास्टिक पिशव्या द्या,कापडी पिशवी मोफत घ्या" असा उपक्रम राबविण्यात आला. घरा घरातून यावेळी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिक पिशव्या महानगरपालिकेच्या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये जमा करण्यात आल्या.


प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर मुंबईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. मुंबईतील दादर मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. सकाळी सकाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या पाहायला मिळतात. नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचं स्वागत केलंय. मात्र कुठल्या गोष्टींवर बंदी यावरुन काही जणांमध्ये संभ्रम असल्याचेही दिसतंय. या प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.